लोणावळा, प्रतिनिधी : साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंती महोत्सव (2026-27) निमित्त लोणावळा-खंडाळा शहर व ग्रामीण जयंती महोत्सव समितीच्या नियोजन बैठकीचे आयोजन गवळीवाडा येथील हॉटेल कृष्णाई येथे करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजनेते दयानंद कांबळे होते.
बैठकीत उपस्थित समाजबांधवांच्या एकमताने सोमनाथ भाऊ बोभाटे यांची 106 व्या जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी चंद्रकांत शिंदे, सरचिटणीसपदी आनंद क्षीरसागर आणि खजिनदारपदी विक्रम बोभाटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडीनंतर उपस्थितांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आगामी जयंती महोत्सव भव्य, दिव्य आणि समाजप्रबोधनात्मक पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी 2025 चे जयंती महोत्सव अध्यक्ष कृष्णा साबळे, ज्येष्ठ समाज नेते नाना रोकडे, विनोद साबळे, बिट्टू गायकवाड,बिपिन मंडलिक कैलास नेटके, एकनाथजी घोरपडे, नर्सिंग वाघमारे, नामदेव कसबे, वैजनाथ कसबे मिकतीराम कसबे, मनोज भाऊ खुडे ,विजय गायकवाड, प्रकाश भाऊ हजारे, शुभम खुडे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत जयंती महोत्सवानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व प्रबोधनपर उपक्रम राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच लोणावळा-खंडाळा शहर व ग्रामीण भागातील समाजबांधवांच्या सक्रिय सहभागातून यंदाचा जयंती महोत्सव अभूतपूर्व स्वरूपात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

✍🏻मुख्य संपादक – लहू राम अडसूळ





















